Pages List

शनिवार, ५ एप्रिल, २०२५

मन आणि नशिब

मन आणि नशिबाचं, 
गणित नेहमीच फसतं. 
कारण, 
मनाला नेहमी तेच आवडतं, 
जे नेमकं नशिबात नसतं.

शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५

बिरोबा

शिवशंभु चा अवतार, देव काशीलिंग भला, 
पिवळ्या या सोन्यामध्ये, देव न्हावूनिया गेला.
आरेवाडी बनातला, देव सांगलीशी आला.
नवसाचा राजा माझा, बिरोबा  हा झाला.

पूर्वाभिमुख गाभारा, सभा मंडप समोर.
चारी बाजू तटबंदी, मध्ये मंदिर सुंदर.
गाभाऱ्यात  बिरोबा, देव दिसे मनोहर.
तुझ्या दर्शनात देवा, सुख मिळते अपारं.

माझ्या मनातली सल देवा, सारी तुला ठाव.
दु:ख हरुनिया सारे देवा, माझ रक्षण करावं.
गोड मानुनीया घ्यावा देवा, भोळा भक्ती-भाव.
नवसाच्या राजा माझ्या, नवसाला पाव.

तुझ्या राऊळात देवा, कोणी लहानथोर नाही. 
ज्याची भक्ती थोर देवा, तोच भक्त थोर होई. 
तुझ्या आशीर्वादाने देवा, जीवन सफल होई.
तू नवसाला पावतो त्याची, झोळी भरून वाही.

मनातलं गाऱ्हाणं हे, तुझ्या पायी ठेवूनिया. 
भक्त देवा भोळा, तुझ्या भक्तीत रमला.
देव माझा दयाळू, मदतीला धावला. 
नवसाचा राजा माझा, नवसाला पावला.