Pages List

गुरुवार, २४ जानेवारी, २०१९

विश्रांती


जगण्याच्या या धावपळीत,
शब्दच तो लुप्त झालाय.
ज्याला कधी काळी आम्ही,
विश्रांती असे म्हणायचो.
  
लुप्तही तो (विश्रांती) असा झालाय कि,
आठवणही त्याची येत नाही.
आठवण काढण्याही त्याची थोडी,
विश्रांती आम्हा मिळत नाही.

मिळालीच ती (विश्रांती) थोडी जर का,
सुखावुनी जाऊ आम्हीही.
आमच्यासाठी सुख  याचेही,
नसे आकाशाहुनी छोटे ते.

काय सांगावे आस तिची,
पामरा या लागली किती.
लागली ती ऐका अशी कि,
जैसी लागते चातकास त्या,
पावसाच्या पहिल्या सरीची.

ना जाणतो लाभेल कधी ती,
कि लाभेल अंतास माझ्या.
लाभली तेंव्हा जरी ती,
आनंदे विसावू कवेत तिच्या.
----- तेजाकांत.

मजनू

जेंव्हा सोडले त्याला लैलेने,
मजनू तेंव्हा खूप रडला.
अन्न-पाणी सोडून म्हणे,
वेड्यासारखा वणवण फिरला.

त्याच लैलेचा कित्ता पुन्हा,
आमच्या लैलेने गिरवला.
तीला वाटले रडेल वेडा,
कपडे फाडुन फिरेल थोडा.

मजनू तर मजनुच होता,
भोळा आणि मवाळ होता.
आमच्या सारखा बारा गावचा,
पाणी तो प्यायला नव्हता.

आसवे तर आम्हीही गाळली,
गाळली फक्त जरा अशी की,
आसवांचे त्या शस्त्र करूनी,
जिवलग तीच्या मैत्रीणीलाच,
सहज आम्ही हो पटवीली.

पटवूनी फक्त थांबलो तर,
आम्ही कसले हो मावळे.
राखीव तीच्या जागेवरती
तीच्याच मैत्रीणीला बसवून,
 गावभर फिरलो आम्ही. 
                ------ तेजाकांत.

झाडाझडती.

लाख वेळा तीने माझी,
आहे झाडाझडती घेतली.
घेतलीही जरा अशी की,
जागा एकही नाही सोडली.

वेगळे काही शोधण्याची,
धडपड तीची खूप होती.
पण तीला सर्व जागी,
तीच होती की सापडली.

सगळीकडे पाहून स्वतःला,
शंका तीची पूर्ण विरली.
विरलीही ती जरा अशी की,
डोळ्यातुनी आसवे झरली.

खरे तर खेळात संशयाच्या,
प्रिया माझी पुरती हरली.
हरुन सुद्धा ती आनंदाने,
मिठीत तेव्हा माझ्या शिरली.
--------- तेजाकांत.