Pages List

शुक्रवार, २१ मार्च, २०२५

इशारा

आम्ही विचारावे, तिने नाकारावे, 
हा खेळ आम्ही खेळत राहिलो.
उत्तर तिच्या इशाऱ्यात दडले होते,
आम्ही शब्दात शोधत राहिलो.

इशा-यातला होकार, कधी ना कळला, 
शब्दांचे नकार, पचवित राहीलो.
असे आम्ही अडाणी मजनू,
आयुष्यभर एकटेच राहीलो.

रविवार, २२ डिसेंबर, २०२४

सुख दुःख

ज्याची लढण्याची तयारी, 
सुख मिळणार तयाला.
दुःख सोचण्याची परी, 
तयारी खास पाहिजे.

दुःख वादळाच्या अंती, 
सुख मिळणार नक्की.
फक्त वादळात थांबण्याचा, 
थोडा संयम पाहिजे.

दुःखासुराचा नि:पात तुझ्याच, 
हाती अटल आहे. 
फक्त लढण्याची तुझी तयारी, 
थोडी झकास पाहिजे.

विषा पाठी  अमृत येते,
तसे दुःख पाठी सुख येणार, 
फक्त समुद्रमंथनाचा,
तुला सराव पाहिजे.

दुःख सागराच्या पैलतीरी, 
सुख अपार आहे.
फक्त किनारा गाठण्याची, 
मनी जिद्द पाहिजे.

दुःख येणारच आहे मित्रा, 
 त्याला पर्याय नाही. 
सुखही येईल मागूनी, 
एवढा विश्वास पाहिजे.
               ------ तेजाकांत.

रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

महात्मा गांधी

महात्मा गांधी

"दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल,
साबरमती के संत तूने कर दिया कमाल,
रघुपति राघव राजा राम. "
या सुंदर ओळी ज्यांच्यासाठी आहेत ते म्हणजे आपले बापू अर्थात महात्मा गांधी.  आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र- मैत्रिणींनो, आज २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती. मी कु. श्रीशा तेजश्री राजेंद्र सरगर, इयत्ता:३ री (अ), डॉ. बापट बालशिक्षण मंदिर, सांगली. तुम्हाला त्यांच्याबद्दल चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे हि नम्र विनंती.

            मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर, या ठिकाणी झाला. त्यांनी लंडन येथून वकिलीचे शिक्षण घेतले. बॅरिस्टर म्हणून भारतात परतले आणि मुंबईत वकील म्हणून काम करू लागले. महात्मा गांधी यांन त्यांच्या एका भारतीय मित्राने कायदेशीर सल्ला घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत बोलावले होते. दक्षिण आफ्रिकेत गेल्यावर त्यांना एक विचित्र प्रकार अनुभवायला मिळाला आणि इथूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली.

एकदा गांधीजी  दक्षिण आफ्रिकेमध्ये रेल्वेच्या प्रथम श्रेणीतून प्रवास करीत होते. त्याकाळी फक्त गोरे लोकच प्रथम श्रेणीतून प्रवास करण्याचा अधिकार ठेवतात असे गोऱ्या ब्रिटिश माणसांना वाटायचे. एका गोऱ्या ब्रिटिश माणसाने त्यांना रेल्वेच्या प्रथम श्रेणी डब्यातून बाहेर काढले. या प्रसंगाने गांधीजी खूप व्यतीत झाले. त्यांनी असे ठरवले की या अन्यायाविरुद्ध चळवळ उभी करायची. तशी त्यांनी ती केली देखील आणि तेथील भारतीय व कृष्णवर्णीय लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिला. या चळवळी दरम्यानच त्यांना सत्य आणि अहिंसेचे महत्त्व समजले.

पुढे ते जेव्हा भारतात आले तेव्हा भारतीय लोकांची अवस्था देखील बिकट होती. लोकांना अंगभर कपडे सुद्धा मिळत नव्हते. हे सर्व पाहून ते खूप व्यतीत झाले आणि त्यांनी विचार केला की जर माझ्या देश बांधवांना अंगभर कपडे मिळत नसतील तर मला देखील अंगभर कपडे घालण्याचा कोणताही अधिकार नाही. असे म्हणून त्यांनी धोतर आणि पंचा एवढेच कपडे वापरायचे ठरविले व ते जीवनभर तसेच राहीले. त्यांच्या या कृतीतून त्यांनी "बदल घडवायचाच असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करा" असा सर्व जगाला संदेश दिला.

त्यांनी आपल्या नेतृत्व क्षमतेने भारतीय स्वातंत्र्यलढ्यास व्यापक स्वरूप दिले. त्यांनी मिठावरील कराविरोधात दांडीयात्रा काढून मिठाचा सत्याग्रह केला, विदेशी मालावर बहिष्कार घातला त्यांची होळी केली आणि स्वदेशीचा नारा दिला, इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन करून इंग्रजांना वेटीस धरले, पुढे त्यांनी चलेजावचा नारा देऊन इंग्रजांविरुद्ध भारत छोडो  आंदोलन पुकारले अशी अनेक आंदोलने त्यांनी यशस्वी केली. या सर्व आंदोलनांचा राग मनात धरून इंग्रजांनी त्यांना वेळोवेळी तुरुंगात टाकले पण गांधीजी कधीही डगमगले नाहीत आणि पुन्हा पूर्वीपेक्षा जास्त उमेदीने ते इंग्रजांविरुद्ध उभे राहिले.

गांधीजींच्या सर्व आंदोलनाचा पाया हा सत्य आणि अहिंसा हाच होता. भारतास १९४७ मध्ये  स्वातंत्र्य मिळवून देण्यात गांधीजींनी सिंहाचा वाटा उचलला आणि सत्य व अहिंसेच्या जोरावरती आपणास मोठ्यातील मोठी लढाई जिंकता येते हे त्यांनी सर्व जगाला दाखवून दिले "एका डोळ्याचा बदला म्हणून जर तुम्ही दुसरा डोळा घेतलात तर सारे जग आंधळे होईल" अश्या शब्दात गांधीजी नेहमी शांततेचा पुरस्कार करायचे. त्यांच्या या सर्व महान कार्यामुळे लोक त्यांना बापू, राष्ट्रपिता व महात्मा म्हणून संबोधतात.

परोपकाराशिवाय मोठी कोणतीही सेवा नाही आणि मानवतेपेक्षा मोठा धर्म नाही असे गांधीजी मानत होते. आयुष्यभर अहिंसा आणि सत्याचा मार्गावर चाललेल्या बापूंनी सर्वांना मानवतेचा धडा शिकवला आणि जीवन जगण्याचा योग्य मार्गही दाखवला. मित्रांनो आजच्या या दिनानिमित्त महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा आणि त्यांचे विचार आत्मसात करण्याचा संकल्प करूया. मी माझे दोन शब्द संपवते, मला माझे विचार 
मांडण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.


जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

कु. श्रीशा तेजश्री राजेंद्र सरगर
इयत्ता:३ री (अ) 
डॉ. बापट बालशिक्षण मंदिर, सांगली.

सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४

शिवाजी महाराज

 सर्व जाती धर्मांना जोडणारा,
एक मजबूत धागा होता,
तो आपला शिवबा होता.

ज्यांच्या लढण्यातील गनिमी कावा,
कुठल्याच शत्रूला उमगला नव्हता,
तो आपला शिवबा होता.

समृद्ध आरमार उभा करणारा,
भारतीय आरमाराचा जनक होता,
तो आपला शिवबा होता.

परस्त्रीला आई समान मानणारा,
जिजाऊंचा तपस्वी छावा होता,
तो आपला शिवबा होता.

आदिलशाही,निजामशाही, पोर्तुगीज इंग्रज,
 १७६० आक्रमकांना पाणी पाजणारा,
अखंड हिंदुस्थानाचा सम्राट होता,
तो आपला शिवबा होता.

मराठी मुलुखाचा भगवा झेंडा,
अटकेपार ज्यांनी गाडला होता,
तो आपला शिवबा होता.
    ------ प्रा. राजेंद्र सरगर (तेजाकांत)
                         (७५८८१६७०८७)

शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

तिरस्कार

चोरून तीला पाहत असता,
झाली आमची नजरानजर. 
आम्ही शोधले प्रेम परंतु,
नजरेत तिच्या होता अंगार.
 
रागभरल्या तिच्या कटाक्षाने,
गर्भगळीत जाहलो आम्ही.
तरीही तिला कळू ना देता,
स्मितहास्य केले आम्ही.

निमिषभराच्या नजरभेटीचा,
काय सांगावा तुम्हा सार,
किती शोधले प्रेम तरी,
आम्हा लाभला तिरस्कार. 

तिरस्काराने संपेल ऐसे,
प्रेम आमचे उथळ नाही.
अनेक वर्षे झुरतोय राणी,
प्रेम आमचे नवखे नाही.

या प्रेमाचा मनात आमच्या,
खूप आहे जुना ज्वर,
जेव्हा करीत होता राणी,
तुम्हीच तुमचा तिरस्कार. 
                    ------ तेजाकांत.

शुक्रवार, १९ मे, २०२३

अहिल्यादेवी होळकर यांची घोषणा

होळकर कुळभूषण, 
इंदोर संस्थान अधिपती, 
कलेची अश्रयदाती, 
नदी-घाट संरक्षिका, 
मंदिर जीर्णोद्धारीका,
तीर्थक्षेत्र विकासिका,
अस्सीम ऊर्जेचे शक्तिपीठ, 
तटस्थ न्यायदेवता, 
शब्दसामर्थ्याची अधिष्ठात्री
पत्रचातुर्य सम्राज्ञी
उत्तम प्रशासिका,
कुशल योद्धा, 
धैर्यशालिनी वीरांगना,
रणरागिणी, 
रणचंडीणी, 
पुण्यश्लोक,
राजमाता, 
देवी अहिल्याबाई होळकर
यांचा विजय असो.